1संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका.
2मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत.
3माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार?
4याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा.
5मृतलोकात तुमचे स्मरण नाही; गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार?
6माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.
7दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत; माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे.
8दुष्टाई करणार्यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.
9याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.
10माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील; ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.