1संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,”
2कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत, त्यावर आपले बाण चढविले आहेत की अंधारातून बाण मारून सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी.
3जर पायाच नष्ट झाला, तर नीतिमान काय करणार?
4परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; याहवेह आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांची दृष्टी सर्व मनुष्यास पाहते; पृथ्वीवर प्रत्येकास ते पारखतात.
5याहवेह नीतिमानाला पारखतात; परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे, अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात.
6जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील; आपल्या दाहक वार्याने त्यांना होरपळून टाकतील.
7कारण याहवेह नीतिमान आहेत, न्यायीपण त्यांना प्रिय आहे; जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.