1मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली; माझी दयेची विनवणी ऐकली.
2कारण त्यांनी आपला कान माझ्या हाकेकडे लावला, म्हणून आजीवन मी त्यांचा धावा करीत राहीन.
3मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते; कबरेच्या भयाने मला ग्रासले, दुःख व क्लेशांनी माझ्यावर मात केली होती.
4तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो: “हे याहवेह, मला वाचवा!”
5याहवेह कृपाळू आणि नीतिमान आहेत; आपले परमेश्वर करुणामय आहेत.
6याहवेह साध्याभोळ्या लोकांचे रक्षण करतात; मी गर्तेत ओढला गेलो असताना, त्यांनी मला वाचविले.
7हे माझ्या जिवा, पुन्हा एकदा शांतचित्त हो, कारण याहवेहने तुझे भले केले आहे.
8कारण हे याहवेह, तुम्ही मला मृत्यूपासून सोडविले, माझे डोळे अश्रूंपासून आणि माझे पाय अडखळण्यापासून रक्षिले आहेत.
9जेणेकरून मी जिवंत लोकांमध्ये राहून, याहवेहच्या समक्षतेत चालू शकेन.
10जेव्हा मी याहवेहवर विश्वास ठेवला तेव्हा मी बोललो, “मी फार पीडित आहे;”
11घोर निराशेच्या भरात मी म्हणालो, “प्रत्येक मनुष्य लबाड आहे.”
12परंतु याहवेहचे माझ्यावरील सर्व उपकार, मी कसे फेडणार?
13मी तारणाचा प्याला उंच करून, याहवेहच्या नावाचा धावा करेन.
14मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.
15याहवेहच्या दृष्टीने, त्यांच्या निष्ठावानांचा मृत्यू अतिशय मोलवान आहे.
16हे याहवेह, मी निश्चितच तुमचा सेवक आहे; माझ्या मातेसमान मी देखील तुमची सेवा करेन; मला तुम्ही बंधन मुक्त केले आहे.
17मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.
18मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.
19यरुशलेमात, तुमच्यासमक्ष याहवेहच्या या मंदिराच्या अंगणात ते पूर्ण करेन. याहवेहचे स्तवन करा.