1दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा, मी दोषरहित जीवन जगलो; याहवेह, मी न डगमगता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
2याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा, माझे मन आणि हृदयाची पारख करा.
3कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.
4कपटी लोकांसोबत मी बसत नाही किंवा ढोंगी लोकांची संगत मी धरत नाही.
5दुष्कर्म करणार्यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.
6मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,
7म्हणजे उंच आवाजाने तुमची उपकारस्तुती करेन आणि तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन.
8याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते, इथेच तुमचे वैभव वसती करते.
9पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला, आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.
10त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत, त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.
11मी तर माझे जीवन निर्दोषतेने जगेन; मला मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा.
12माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत; महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.