1शलोमोनने जेव्हा याहवेहचे मंदिर व राजमहाल बांधण्याचे काम संपविले, आणि त्याला जे काही करावयाचे मनोरथ होते ते साधल्यानंतर,
2याहवेहने शलोमोनला जसे गिबोन येथे दर्शन दिले होते, तसे त्याला दुसर्यांदा दर्शन दिले.
3याहवेह शलोमोनला म्हणाले: “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनंती मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहे तिथे सर्वकाळासाठी माझे नाव देऊन मी ते पवित्र केले आहे. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.
4“तुझ्या बाबतीत म्हणायचे तर तू आपला पिता दावीद याच्याप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे हृदयाच्या सरळतेने चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील,
5तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीद याला मी अभिवचन देत म्हटले होते, ‘इस्राएलच्या राजासनावर तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’
6“पण जर तू किंवा तुझी संतती माझ्यापासून दूर वळली आणि मी तुला दिलेल्या आज्ञा व विधी पाळले नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली,
7तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील.
8हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तुच्छतेने म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’
9तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”
10शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.
11शलोमोन राजाने सोरचा राजा हीराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली, कारण त्याने हवे असलेले सर्व गंधसरू, देवदारू, आणि सोने शलोमोनला पुरविले होते.
12परंतु जेव्हा शलोमोनने त्याला दिलेली नगरे पाहण्यासाठी हीराम सोरवरून गेला, ते पाहून त्याला समाधान झाले नाही.
13तेव्हा तो म्हणाला, “माझ्या भावा, ही कशी नगरे तू मला दिलीस?” आणि त्याने त्यास काबूल प्रांत असे नाव दिले, ते नाव आजही प्रचलित आहे.
14हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांत सोने पाठवले होते.
15शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकाम, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे.
16(इजिप्तचा राजा फारोहने गेजेरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते. त्याने त्याला आग लावली व त्यातील कनानी रहिवाशांना मारून टाकले व ते नगर आपली कन्या, शलोमोनच्या पत्नीला तिच्या लग्नाची भेट म्हणून दिले.
17आणि शलोमोनने गेजेर नगराची पुनर्बांधणी केली.) त्याने खालचे बेथ-होरोन बांधले,
18वाळवंटातील देशाच्या हद्दीतील बालाथ आणि तदमोर बांधली,
19त्याचप्रमाणे शलोमोनचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे व नगरे; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व प्रदेशात त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
20अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते).
21या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत.
22परंतु इस्राएली लोकांपैकी कोणावरही शलोमोनने गुलामी लादली नाही; ते त्याचे योद्धे, त्याचे सरकारी अधिकारी, सरदार, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.
23शलोमोनच्या प्रकल्पांवर जे मुख्य अधिकारीसुद्धा होते, ते पाचशे पन्नास जण होते, जे माणसांवर देखरेख ठेवणारे मुकादम होते.
24फारोहची कन्या दावीदाचे शहर सोडून शलोमोनने तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आली, मग त्याने स्तरीय बांधकाम केले.
25याहवेहसाठी बांधलेल्या वेदीवर शलोमोन वर्षातून तीन वेळा होमार्पणे, शांत्यर्पणे करून त्याबरोबर धूप जाळत असे, अशाप्रकारे त्याने मंदिराची कर्तव्ये पूर्ण केली.
26शलोमोन राजाने एदोम देशात तांबड्या समुद्रतीरी एलोथजवळ एजिओन-गेबेर येथे सुद्धा गलबते बांधली.
27आणि हीरामाने त्याच्या अनुभवी खलाश्यांना शलोमोनच्या माणसांबरोबर सेवा करण्यास पाठवले.
28त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.